प्रिय घर,
आदरपूर्वक नमस्कार
आज तुला पहिल्यांदा पत्र लिहितेय. तेही तुझ्यात राहूनच. गम्मतच आहे. घर ही तशी प्रत्येक माणसाची अतिशय जवळची, जिव्हाळ्याची आणि खाजगी गोष्ट. मग ते घर वीतभर असो की फूटभर. भाड्याचं असो किंवा स्वतःचं. पण ती प्रत्येकाची हक्काची अशी जागा असते. तू एक असा निवारा आहेस ज्यात दिवसभर राबून तुझ्या आसऱ्याला जेव्हा आम्ही येतो तेव्हा बाहेर सोसलेलं सगळं झोपेत हरवून टाकतो.
आता बरोबर एक महिना उलटून गेला, आम्ही तुझ्यातच चोवीस तास राहतोय. घरातून बाहेर जायचं नाही हे बजावून सांगितलं जातंय. आधी सकाळी लवकर उठून , आवरून तुला कुलुप लावलं की थेट रात्रीच तुझं दार उघडायचो. तुझा दीर्घ असा सहवास गेल्या दोन वर्षात, म्हणजे तुला घेतल्यापासून मी पहिल्यांदाच अनुभवतेय.
तुला घेतांना, तुझी वास्तुशांत करताना, तुझ्यासाठी पै पै जमवताना काय काय करावं लागलं सगळ्या कुटुंबाला. तू पाहताच क्षणी आम्हा सगळ्यांना आवडला होतास. माझा मुलगा सरगम तर तुझ्या प्रेमातच पडला होता. तुझी बाल्कनी आणि तिथून दिसणारा डोंगर ह्यांनी काबीज केला. तुझे कोपरे, तुझी मोकळी जागा सगळं आम्हाला आवडलं आणि आम्ही तुझ्यात राहायला आलो.
तुझ्यात आल्याने एक वेगळा उत्साह आमच्यात भरला होता. माझा नवरा नमन, सरगम आणि मी आम्ही तिघांनी मिळून तुला किती छान सजवलं. वेळातवेळ काढून तुझे प्रत्येक कोपरे सजवले, सरगमने त्याची खोली पूर्ण चित्रांनी भरवली. पुस्तकं लावली, पियानोला जागा दिली. स्वयंपाकघराचा ताबा मी घेतला. प्रत्येक डब्बा कुणी दिला, कधी घेतला हे सगळं आठवतं आजही. हॉलवर नमनचा हात फिरला.. हॉल रिकामा हवा, फर्निचर नको असा त्याचा हट्ट. आमच्या दोघांची खोलीही आम्ही मिळून सजवली.
सहा- सात महिने होऊन गेले तुझ्यात राहायला येऊन सगळं कसं मस्त चाललं होतं. तिघे किती रमलो तुझ्यात. आणि एकदिवस अचानक संकट कोसळलं. सरगमचा कॉलेजला जाताना अपघात झाला. त्यातच तो दगावला. माझं अठराव्या वर्षातलं कोवळं पोर गेलं. पायाखालची जमीनच सरकली.
सरगम गेला, पण त्याची त्याच्या हातांनी सजवलेली खोली, त्याचा पियानो, त्याची पुस्तकं अजूनही तशीच आहेत. तू त्याला इतका आवडला होतास की तो दिवस दिवस घरातून बाहेर पडायचा नाही. आम्ही नसलो तरी तू त्याच्या सोबत असायचास. घर कोंबडाच होता तो. तुझ्यातून बाहेर न पडणारा नंतर तुला भेटायला आलाच नाही. तुलाही ते जाणवलं असेल. तुही त्याची वाट पाहतोस ना? दीड वर्षं झाली आता या गोष्टीला.
कुणी कुणासाठी थांबत नाही हेच खरं. तुझे हफ्ते अजून आहेत त्यासाठी काम करावं लागतंच. नमन पण आता खूप शांत असतो. घरी लवकर न येणारा, रात्रभर काम करत राहणारा नमन नेहमीचा नमन राहिला नाही. आपला तरुण मुलगा गेला ही गोष्ट पचवणं किती अवघड आहे हे अनुभवतोय तो शांत राहून. पण तो हे पचवेल. मला खात्रीय.
तू खूप आधार देतोस. तुझ्यात येऊन निवांत बसणं, बाल्कनीतून तासंतास डोंगर पाहणं, आलेलं उन्ह अंगावर घेणं, आणि सरगमचा पियानो वाजवणं हे मला आवडू लागलं आहे.
या लॉकडाउनमध्ये नमन आणि मी दोघे तुझाच आधार तर घेतोय. आज सरगम असता तर ? विचार करूनही डोळ्यांत खळकन पाणी येतं. पण तरीही तो काही आता परत येणार नाही. पण तुला मात्र मी नव्याने अनुभवतेय.
तुझ्याकडे जरा दुर्लक्षच झालं माझं. तुला घेतांना जो उत्साह होता तो आलाय थोडा पुन्हा. म्हणजे रोज तुला साफ करताना, एकेक क्षण आठवतोय. भूतकाळ जो चांगलाच होता आणि तुझ्या सोबत घालवला तो वर्तमानात आठवून मी स्वतःचं मन सावरतेय. तुला आवरतेय, नमनची काळजी घेतेय. एक गृहिणी म्हणून मी मला जमेल तसं करतेय. बाकी काही नाही.
तू एक अशी जागा आहेस ज्यात मी रडू शकते, हसू शकते, माझं मन मोकळं करू शकते. आम्ही तिघांनी मिळून बनवलेलं हे घर माझी जबाबदारी आहे आणि तू एक वास्तू जरी असलास तरी माझ्या कुटुंबाचा कणा आहेस हे कसं विसरू? असो.
मी भाग्यवान आहे कारण तुझं छप्पर आहे मला. किती लोक बेघर आहेत, रस्त्यावर राहतात. हे संकट खूप मोठं आहे. कुण्या एकट्याचं नाही, सम्पूर्ण जगाचं आहे. मी तर तुझे आभार मानले पाहिजे आणि तुझ्या विश्वात ऊब घेत जगत राहिलं पाहिजे. गेलेला, घडून गेलेला काळ काही पुन्हा येणार नाही, पण येणाऱ्या चांगल्या काळासाठी मात्र तुझी सोबत आहे त्याबद्दल कृतज्ञता व्यक्त केली पाहिजे. इतकंच.
थांबते.
तुझ्यात राहणारी,
कमल नमन!
खूपच छान