प्रिय अनय,
मला माहीत आहे, तुझ्या कामाच्या गडबडीत इनबॉक्समध्ये माझं पत्र येऊन धडकल्यावर तू दुर्लक्ष करशील. मग तुझ्या डोक्यात, पत्रात काय असेल बरं? हा विचार घोळत राहील आणि मग कितीही टाळायचा प्रयत्न केलास ना तरी तू तुझ्या ईमेलच्या इनबॉक्समधून हे पत्र उघडशील आणि वाचशील.
लहानपणापासून ते आतापर्यंत मी पहिल्यांदाच तुझ्या विरोधात गेले म्हणून तुला माझा राग येणं साहजिकच आहे.
ए, तुला आठवतंय, मागच्या वर्षी खूप स्टाईलमध्ये एक डायलॉग तू सारखा म्हणायचास. ‘शेती इकायची नसते ओ, राखायची असते’. मुळशी पॅटर्न चित्रपटातला. अगदी फर्स्ट डे, फर्स्ट शो पाहायला घेऊन गेला होतास ना सगळ्यांना. तरडेंचा हार्ड कोअर फॅन आहेस ना तू? मग त्यांना किती वाईट वाटेल, आपल्या एका फॅनने वैतागून शेती विकली हे कळल्यावर? ह्यासाठीच चित्रपट केला होता का त्यांनी? मग तू हा चित्रपट पाहून काय शिकलास? आता हे वाचताना, मी कोणतेही connections कुठेही लावते असं म्हणत तू मनातल्या मनात मला काय बोलत असशील हे मला चांगलेच ठाऊक आहे. तुला सांगू, आपल्या कृषीप्रधान देशाचं सगळ्यात जास्त वाटोळं झालं असेल तर भाऊबंदकी आणि बांधावरच्या भांडणामुळेच. म्हणूनच हे शेती करणं जास्त कॉम्प्लिकेटेड वाटू लागतं. अस्मानी संकटावर technology मुळे एकवेळ मात करायला जमेलही कदाचित आपल्याला. तुझ्या-माझ्यासारख्या असंख्य शहरी, निमशहरी भागात राहणाऱ्या उच्च शिक्षित तरुणांच्या जमिनीचे तुकडे तसेच पडून राहतात. ह्यामुळे तू एकटा असा त्रास सहन करणारा नाहियेस बरं.
आता अनुपचं बघ ना. त्याच्या शेतातली मोटर दर दोन महिन्यांनी चोरीला जाते, कधी पाईपलाईन तोडली जाते, कधी शेतात काही गडबड होते. अगदी त्याचा बागायत भाग असला तरीही. कारण तो तिथे राहत नाही. आता शेतात जेव्हा चोरी होते, तेव्हा चोरी करणारा हा ओळखीतलाच असतो आणि कोण असतो हेही माहीत असतं; पण एक छुपी दहशत असते ना. ह्या शेतीच्या महाभारतासाठी एक नवी गीता रचली जाण्याची आवश्यकता आहे.
त्या अहिल्याची situation वेगळी आहे. तिच्या बाबांच्या डोक्यात एकाने भरवलं आहे, तिचं लग्न झालं की शेती विकून टाका. कुठे ही कटकट सहन करता. काही जण असा सल्ला देतात. तिचे बाबा तयारही झाले आणि मग रोजरोज अहिल्यासाठी स्थळं येऊ लागली. पण बी. एस्सी. ऍग्री झालेल्या, पाना-फुलात रमलेल्या अहिल्याच्या डोक्यात कसली सनक भरली असेल हे तुला वेगळं सांगायला नकोच! पण ती खमकी आहे म्हणून तिचा निभाव लागू शकतो.
रोह्याने रुबाबात फार्म हाऊस बांधलं. पण फार्महाऊसपर्यंत जाण्याची वाटच अडवून ठेवली आहे त्याची.
तेथील काही लोकांनी त्याच्या गड्यांना पळवूनही लावलं.
अतुलला काही प्रॉब्लेम नाही तसा. पण त्यांच्याइथे दुष्काळ आहे ना म्हणून जमीन असूनपण काहीच उपयोग नाही आणि त्यात सरकारी योजनांचा लाभ घ्यायचा म्हणजे सारखा पाठपुरावा करायचा.
त्यातून अलीकडे झाडांवर केमिकलचा मारा इतका होतो की जमिनी कसण्यालायक राहतच नाहीत. त्यातून गावाजवळ एम.आय.डी.सी. असेल तर विचारूच नको! प्रदूषणामुळे पाणी पिण्यालायक राहत नाही, अगदी विहिरी मधलेपण. म्हणून टँकरने पाणीपुरवठा करावा लागतो. आजूबाजूला भरपूर पाणी उपलब्ध असूनपण ते आपण पिऊ शकत नाही, ह्यापेक्षा मोठं दुःख नाही.
मला ठाऊक आहे, तुझं ठरलंय. सध्या तू आर्थिकपणे कितीही स्थिर असलास तरी तू तुझ्या शेतात जाऊ शकत नाहीस. तिथल्या राजकारणामुळे तुला फिरकायचंही नाहीये तिथे. पण तू शेती विकलीस तर कदाचित तुला, नाही तुला नाही, तुझ्या मुलांना गावच राहणार नाही. त्यांना कळणारच नाही वाऱ्याची झुळूक काय असते, आभाळाचं छत काय असतं आणि कष्ट काय असतात. कष्ट जरी करावे नाही लागले तरी डोळ्यांनी पाहिल्येल्या आपल्या माणसांच्या कष्टाची जाणीव आपल्याला असते असं मला वाटतं.
आपल्याला काका, अण्णा, दादा, अक्का अशा अनेक निर्मळ मनाच्या माणसांचं प्रेम मिळालं. कदाचित त्यांना आई-बाबांव्यतिरिक्त कोणी निस्वार्थ जीव लावू शकतं हेदेखील कळणार नाही. तुझ्या आजूबाजूलाच बघ ना. ह्या चकचकीत माणसांच्यात किती खुजेपण आहे. माईंड युअर ऑन बिझिनेसच्या जगात मोकळ्या मनाची आणि एकमेकांसाठी असणारी माणसं कशी तयार होणार? आणि हो आपली ओळख ही आपल्या गावामुळेच जास्त आहे अजूनही, नाही का? माझंच बघ ना, माझी आज्जी ज्या पद्धतीचं मराठी बोलायची, ज्या गोष्टी सांगायची, मला तशी मराठी इथे लहानपणापासून शहरात वाढल्यामुळे बोलायला अजिबात जमत नाही. अगदी तिने तोंडी सांगितलेल्या पाककृतींमध्येदेखील खूप वेगळेपण असायचं. म्हणजे आपण नकळत संस्कृती सोबत भाषासुद्धा नष्ट करत आहोत.
शेती म्हणजे फक्त जमिनीचा तुकडा नसतो रे.कित्येक पिढ्यांनी घाम गाळलेला असतो तिच्यात. तो घाम त्या मातीत मिसळलेला असतो. आणि अप्रत्यक्षपणे
आपले पूर्वज आपल्या सोबतच असतात, ही कल्पनाच खूप भन्नाट आहे ना!
आता हळूहळू तुला माझ्या गोष्टी पटत असतील. पण तू पाशीच अडला असशील, ठाऊक आहे मला.
‘सध्या लॉकडाऊन आहे’, हे ऐकूनपण तुला जाम कंटाळा आला असेल. सगळं सुरुळीत कधी होईल हे तुला-मला कोणालाच नीट माहीत नाही. त्यातून आपल्याला आत्मनिर्भर होण्याचे धडे दिले आहेत ना. आता हे रिकामे जमिनीचे तुकडे वापरायला काढलेच पाहिजेत. आपल्या देशाची आर्थिक स्थिती सुधारण्यासाठी देशी वस्तू विकत घ्याव्या लागणार. मग आपला त्याला हातभार लागायला नको का? तू मल्टिनॅशनल कंपनीमध्ये काम करत असला, तरी त्याचा मालक कधीतरी त्याचा मालकी हक्क दाखवणारच! ती कंपनी आपली समजून काम केलं तरीही. म्हणून जे आपल्याला मालकीचं, हक्काचं, ते शाबूत ठेवावं माणसाने, हे माझं मत झालं. हल्ली शेतीतपण अनेक नवे ट्रेंड्स सुरू झाले आहेत. जसं की रेंटवर शेती देणं. बरेच ग्रीन हाऊस आपण पाहतो, ते रेंटवरचं असतात आणि कोकणात तर पावसाळ्यात भात लागवड करायला जाणे हे देखील ट्रेंडिंग आहे. अगदी दरवर्षीच्या हुरडा पार्टीसारखं. बट ऑन अ सिरीयस नोट,सगळीच अर्थव्यवस्था कोलमडली आहे. शेतमालालाही भाव नाही. अशा स्थितीत जे गरीब शेतकरी आहेत त्यांच्याकडे पेरणी करायला पैसे कुठून येणार? म्हणजे साहजिकच वस्तूंचा तुटवडा जाणवणार. अशा स्थितीत आपणच काही युक्ती करायला हवी, जेणेकरून जमिनेचे रिकामे तुकडेही हिरवेगार होतील. पटतंय ना? मला ठाऊक आहे, तुला माझं बोलणं पटत असणार. चल तर मग सुरुवात करू आपला भारत खऱ्या अर्थाने सुजलाम सुफलाम् करण्यासाठी. मनातल्या मनात “लेट मी थिंक” असं तू म्हणत असशील. चल… बाय मी पत्र संपवते. वेळ भेटल्यावर तू ह्या पत्राचे उत्तर देशील हे देखील मला माहीत आहे. काळजी घे
तुझी मैत्रीण,
श्रद्धा सुभाष जगदाळे.

Shraddha Jagdale

Shraddha Jagdale is a website content writer from Pune. She has tried her hands on various kinds of contents from press releases to advertisements. Her press articles have been published in reputed magazine’s like Forbes. She is keen to explore, research & learn new things. Having an engineering background Shraddha tries to blend science and arts together. Her articles, interviews, poems, stories & reviews have been published in various magazines. She is founder of ‘Grounded’ a website created with an intend of appreciating people.