प्रिय ‘सान्सा’,

कशी आहेस? ‘विंटरफेल’ कसं आहे? तुझ्यावर आणि ‘विंटरफेल’वर पुन्हा नवं कुठलं संकट येऊ नये, असं वाटत राहतं. आणि म्हणूनच तुझी खुशाली विचारण्यासाठी आज हे पत्र लिहायला घेतलं आहे.

तू आणि ‘विंटरफेल’ म्हटलं की लख्ख आठवतं ते तुझं बालपण. अगदी चारचौघींसारखी होतीस तू. जुन्या वळणाची, जराशी शिष्ट तरी गोड! ‘जॉफ्री’ आपल्या योग्यतेचा नाही हे लक्षात न येण्याएवढी बावळट होतीस. चांगलं-वाईट यात फरक करण्याची समज तुझ्यात आलेली नव्हती. जगणं एवढं सरळ नसतं आणि माणसं जशी दिसतात किंवा स्वतःला जशी दाखवतात तशी नसतात, हे कळण्याचं वय नव्हतं आणि म्हणूनच तुझ्या बाबापेक्षा तो दुष्ट आणि घमंडी ‘जॉफ्री’ तुला जवळचा वाटला.
तुझ्यात आणि आर्यात वयाचं तसं फार अंतर नव्हतं. पण जगण्याकडे बघण्याच्या तुमच्या नजरा एकमेकींपेक्षा अगदी वेगळ्या होत्या. आर्याची फारशी फिकीर वाटली नाही. कारण तिनं भरतकामाच्या सुया सोडून ‘नीडल’ नावाच्या तलवारीशी खेळायला सुरुवात केली होती. तू मात्र स्वप्नाळू होतीस. स्वप्न रंगवत राहिलीस, त्यांच्यात गुंतत राहिलीस… आणि म्हणूनच तुझ्याविषयी उगाच हळवं वाटत राहिलं.

‘जॉफ्री’शी लग्न करण्याच्या साध्या कल्पनेनं मोहरून गेलीस तेव्हा, खरं सांगते, राग आला तुझा. वाटलं येऊन सांगावं ‘चुकीच्या माणसावर भाळलीस. इथंच थांब, नाहीतर राखरांगोळी होईल आयुष्याची.’ पण जिथं जन्मदाते आई-बाबा, भावंडं यांच्या समजावण्याचा तुझ्यावर फरक पडला नाही, तिथं मी कोण? त्यामुळं, घडतंय ते बघत राहण्याशिवाय दुसरा पर्याय नव्हता.
तू विंटरफेल सोडलंस… आणि राजधानीत पाऊल टाकलंस. केसांचं वळण बदलून राजधानीतल्या बायका करतात, तशी केशरचना करू लागलीस. राजधानीच्या रंगात रंगू लागलीस. पण तुझा हा आनंद फार काळ टिकणार नव्हता. बघता बघता मनातल्या सगळ्या शंका खऱ्या ठरल्या आणि एका विचित्र वळणावर आणून ठेवलं आयुष्यानं तुला. ज्याच्यावर भिस्त ठेवून होतीस त्या ‘जॉफ्री’ला तुझ्यावर प्रेम करायचंच नव्हतं. त्याला फक्त तुला गुलाम करून घ्यायचं होतं, खेळणं म्हणून वापरायचं होतं. आणि त्यानं ते केलं. तेवढं करून थांबणार तो ‘जॉफ्री’ कसला? तुझ्या बाबाचं शीर तुझ्या डोळ्यांदेखत धडावेगळं करण्यापर्यंत मजल गेली त्याची. तू ओरडलीस, किंचाळलीस आणि भोवळ येऊन पडलीस… जागी झालीस तेव्हा सगळं संपलं होतं. सगळं हिरावून बसली होतीस तू. कुटुंब विखुरलं होतं, पाहिलेली सगळी स्वप्नं चुरा झाली होती.. तुझ्या निष्पाप चेहऱ्यावरचं कोवळं वयसुद्धा पळून गेलं होतं कुठल्या कुठं. रात्रीत मोठी झालीस तू. उगाच थोराड वाटू लागली.

आयुष्याची परवड इथं तरी थांबायला हवी होती. पण तसं झालं नाही. आसपासची सगळीच माणसं आपल्या गरजेप्रमाणं, सोयीप्रमाणे वापरत राहिली तुला. कोणी सौदा केला तुझा, कोणी ढाल म्हणून वापरलं. असल्या या जीवघेण्या गदारोळात कशासाठी जिवंत होतीस तू, कशाच्या बळावर जिवंत होतीस.. हे तेव्हा कळू शकलं नाही मला. पण हळूहळू तुझ्यातल्या बुद्धिमत्तेची, चिकाटीची प्रचिती आल्याशिवाय राहिली नाही. आसपासची माणसं राजकीय फायद्यासाठी इकडून उचलून तुला तिकडं टाकत होती. तू मात्र याच माणसांकडून जगण्याच्या राजकारणाचे धडे बारकाईनं घेत गेलीस. एवढ्या टोकाच्या वाईट गोष्टी तुझ्यासोबत घडल्या. यापेक्षा आणखी वाईट असं काय घडायचं बाकी होतं? आणि म्हणून चांगलंच घडायला सुरुवात झाली. बघता बघता माणसं ओळखायला, कोणाशी कसं वागायचं ते ठरवायला शिकलीस तू. चिकाटीनं लढत राहिलीस, आला दिवस ढकलत राहिलीस. आणि मजल दरमजल करत शेवटी आपल्या लाडक्या घरी – ‘विंटरफेल’ला येऊन पोहोचलीस…

आज तुला ‘क्वीन ऑफ द नॉर्थ’, म्हणजेच ‘विंटरफेल’ची राणी म्हणताना हा सगळा वेडावाकडा प्रवास डोळ्यासमोर उभा राहतो. आणि तू खूप खूप मोठी वाटतेस.
तुला वाटेल, आज हे पत्र मलाच का लिहिलं गेलंय. सख्ख्या भावानं जिच्या आयुष्याचा सौदा केला त्या डिनॅरीअसचा प्रवास काय कमी खडतर होता? तिचं ‘खलिसी’ म्हणून उभं राहणं, वाळवंटात तग धरून राहणं कमी प्रेरणादायी होतं? केस कापून आपण मुलगी असल्याचं लपवत कैद्यांच्या कॅम्पमधून फिरणाऱ्या, नाईट किंगला एका घावात खलास करणाऱ्या आर्याचा प्रवास तरी कुठं कमी प्रेरणादायी होता.
खरंय. त्यांचे प्रवास तुझ्याएवढेच खडतर आणि प्रेरणादायी होते. आणि असं असलं तरीही आज पत्र तुलाच लिहीत आहे. कारण, या सगळ्यांमध्ये तू मला अधिक जवळची वाटतेस.

स्थळ-काळ-देश अशा सगळ्या सीमा ओलांडून तू मला माझ्या आसपास दिसतेस. शरीराची पाश्चात्य ठेवण सोड, आसपास वावरणाऱ्या प्रत्येक भारतीय स्त्रीमध्ये मला तूच दिसतेस. तुला माहीत असेल-नसेल कोणास ठाऊक, पण तू जगलीस त्यापेक्षा भारतीय स्त्रियांचं जगणं फार वेगळं नसतं. भाबड्या स्वप्नांमध्ये रंगणं, आई-बापाचं घर सोडून बाहेर पडणं, नवऱ्याच्या घरी रुजण्याचा प्रयत्न करणं आणि या-ना-त्या मार्गानं आयुष्याची फरपट करून घेणं… थोड्याफार फरकानं याच चक्रात अडकलेल्या भारतीय स्त्रीची मला तू खऱ्या अर्थानं प्रतिनिधी वाटतेस. वरवर इतरांसारखाच वाटणारा तुझा प्रवास माझ्या नजरेतनं बघशील तर निश्चितच वेगळा वाटेल. माझ्याशी जवळीक साधणारा वाटेल. आणि म्हणूनच ज्या चिवटपणानं तू जगत आलीस त्या चिवटपणाची किंमत मला कळते. तू स्वतःमध्ये घडवून आणलेल्या प्रत्येक लहान-सहान बदलाचं कौतुक मला वाटतं. ज्या पहाडी जिद्दीनं तू जगत आलीस, ती जिद्द माझ्या आसपासच्या स्त्रियांमध्ये यावी आणि त्यांच्यातली प्रत्येक जण आपल्या आपल्या आयुष्याच्या राणी व्हावी, अशी मनोमन इच्छा आहे.
दशकभरापासून साचलं होतं त्याला आज वाट करून दिली. आता थांबते.
मनस्वी जग.

तुझीच,
तुझ्यासारखीच एक स्त्री !

(सान्सा हे ‘गेम ऑफ थ्रोन्स’ या अमेरिकन टिव्ही सिरीजमधील एक पात्र आहे.)

Kavita Datir

Kavita Datir is a Writer and a Film maker. She is author of book ‘Kavitachya Kavita’. She has worked as an Assistant Director for films like ‘Deool’, ‘Masala’,etc. Also shows like ‘Dance India Dance’, ‘Swapnanchya Palikadale’, ‘Maziya Priyala Preet Kalena’, etc.

 

Join our Writer’s Community on WhatsApp Group and get connected to all the Writers.

https://chat.whatsapp.com/IG6s4w2ApPk02xLylR1P8A