|| श्री नो प्रॉब्लेमाय नमः||
दि. – मला विचार करायला लावणारा दिवस
पत्ता. – तुला कधीच सांगणार नाही.
स. न. वि. वि.
(गैरसमज होऊ नये म्हणून खाली full form सुद्धा लिहितोय.
‘सप्रेम नकोशी विनंतीसह विरोध.’)
प्रति,
पत्ता. – सगळ्यांचंच घर..
प्रिय problem,
(तुला प्रिय ऐवजी खूप विशेषणे जोडायची आहेत. अप्रिय, नप्रिय, कुप्रिय, unप्रिय, disप्रिय, परप्रिय.. पण प्रिय म्हणून घेण्यासारखं तू काहीही आयुष्यात केलेलं नाहीस. असो.)
म्हणून (नुसतं) problem, तुझे कुठलेही पत्र मिळाले नाही. मिळाले असते तरी वाचून आनंद झाला नसता. तुझी ख्याली खुशाली जाणून घेण्यात काहीही रस नाही. त्या शिवाय पत्राऐवजी एखाद्या जहाल संसर्गजन्य रोगाने मेलो अशी तार केली असती तरी आवडले असते. हल्लीच्या वातावरणात तू कसा काय सगळ्या रोगांवर लसी बाळगून आहेस ह्याचे नवल वाटते. असो.
पत्र लिहिण्यास कारण कि, तुला दोन शिव्या पोटभरून द्याव्यात आणि आपलं frustration काढावं म्हंटलं जरा. पण हे पत्र पोहचे पर्यंत तू आपला एखाद्या पौराणिक देवासारखा कुठलं तरी रूप घेऊन माझ्या आयुष्यात आलाच असशील ह्याची खात्रीहि मला आजकाल झालेली आहे. माझा तुझ्या बद्दलचा acceptance हल्ली जरा जास्तच वाढलेला दिसतो. आणि त्याला कारण तूच आहेस. जर हे पत्र तू माझ्या आयष्यात येण्या आधी मिळालं तर जरा थांबून वाच आणि माझ्या सारख्या सभ्य माणसाला कधीही त्रास देणार नाही अशी शपथच घेऊन टाक बरं.
खरी आपली ओळख साधारण मला कळायला लागल्या पासूनचीच. त्या आधी नुसतं रडायचं, खायचं आणि झोपायचं एवढच माहिती होतं रे.. आह्ह.. those were the days. तेव्हा तुझी लहान बहिण worry (चिंता) हिचा आणि माझा दूरदूर पर्यंत संबंध नव्हता. आता worry आमच्याच कडे राहायला असते. माझ्यावर तर ती भाळलीये आणि लग्न कर म्हणून मागे लागलीये. तिची जुळी बहिण don’t worry चांगली आहे. थोडा दिलासा ती देते पण ती माझ्यापासून लांब पळते.
तर, आपली खरी ओळख झाली ती मला समज आल्यावर. आणि माझा गैरसमज झाला कि तू फक्त गणितात problem म्हणून येतोस. गणितातून आयुष्यात तू कधी उडी मारलीस ह्याचा पत्ताच लागला नाही. तुला माझा पत्ता कसा लागला ह्याचाही सुगावा लागला नाही आणि तू आलाच नसतास आयुष्यात तर काय झालं असतं असा विचार करत मी worry माझ्या आयुष्यात आली. त्याकाळी गणितात तुला सोडवायला माझ्याकडे अनेक फॉर्म्युले होते पण तरीही तू मला अवघड वाटलास आता आयुष्यातले problem सोडवताना फॉर्म्युले कमी आणि सल्ले जास्त आहेत.
problem, मागच्या आठवड्यात तुझी facebook request आली होती. कोट्यावधी mutual friends दिसले. कधी नव्हे ते मी ती delete च केली नाही तर तुला block करून report this as a problem अशा वर सुद्धा click केलं. अशा मुळे मला लोक पळपुटा म्हणतात आणि तेच लोक दुर्दैवाने मला तुझ्या friend list मध्ये दिसले. ‘आपण problem पासून पळून चालत नाही तर तो सोडवला पाहिजे, हा आयुष्य जगण्याचा फॉर्म्युला आहे.’ असा सल्ला तेच लोक मला देतात. मग मी त्या लोकांना शिव्या देतो आणि माझ्याशी भांडण हा नवीन problem आहे असं त्यांना वाटतं.. बिचारे ते तुला सोडवत बसतात.
तू जर आलाच नाहीस आयुष्यात तर सोडवत बसण्याची गरजच काय.. मग मी तू येण्याचे सगळे मार्ग आता बंद करतोय. आता हे मी तुला फोन करून, whats app करून सांगूच शकत होतो. पण पत्र जायला वेळ लागेल तसं यायलाही वेळ लागेल तेवढा वेळ मला तुझ्यापासून शांतता मिळेल हा त्यामागचा हेतू आहे. जर चुकून हे पत्र speedpost नी तुझ्या पर्यंत आलं तर उत्तर लिहायला आरामात वेळ घे आणि उत्तरात मी लवकरच भेटीला येतोय असं लिहू नकोस. सध्या मानसिक problem नाहीयेत तुझ्या अशा धक्क्यांमुळे जर ते लवकर भेटीला आले तर जगणं अवघड होऊन बसेल.
problem, तुझं नाव problem कुणी ठेवलं हा प्रश्न पडतो मला. आणि खरं सांगू का? खरं तू एकटा असशील ह्यावर सुद्धा माझा विश्वास नाही. मला वाटतं तुमच्या सगळ्यांचं आडनाव problem असेल. त्यात social problem आणि political problem ह्या दोघांनी लग्न केलं असावं आणि त्यांना mental problem आणि financial problem अशी मुलं झाली असावीत. तुमच्या बहिणीचं लग्न तुम्ही worry घराण्यात लावून दिलं असेल आणि don’t worry मात्र single आहे हे माहितीये मला. तिला मंगळ असावा बहुतेक.
तर problem, पुढील काही ओळी ह्या मी लिहील असं मला कधीही वाटलं नाही. ‘तू आयुष्यात आलास आणि जगण्याचा अर्थ मला कळला आणि मी upgrade होत गेलो. जगण्यात चढ उतार आणायला तू शिकवलेस आणि आनंद घेण्याचा खरा अर्थ काय असतो हे तू आम्हाला सांगितलंस.’ ह्या अशा गलिच्छ आणि फुटकळ philosophy वर माझा काडीचा विश्वास नाही. दुःख आलं तरच सुख कळतं वेगेरे मूर्खासारख्या गोष्टी आहेत. आयुष्यभर सुखी राहिलेला माणूस सुद्धा सुखाने जगू शकतो त्यासाठी problem तुझी आम्हाला गरज नाही so fuck you. तुला भेटण्याची आणि तुझं तोंड बघण्याची इच्छाच नाही आम्हाला.
जाता जाता, वडीलधाऱ्या problem ना लवकर मरून जाण्यासाठी साष्टांग विनंती आणि छोट्या छोट्या problem ला गोड गोड पापा द्यायला माझ्या जवळ येऊ नका हा आग्रह. लवकरात लवकर worry ला घरी पाठवतोय. worry तिकडे आली कि तिला सोबत घेऊन आयुष्यभरासाठी तुमच्या घरात lockdown करा नाहीतर माझ्या एवढं वाईट कुणी नाही हि धमकी.
तु दिलेल्या तसदीबद्दल तूच क्षमस्व.!
सतत तुझ्यावर राग काढणारा
मी.