तुला पत्र लिहायचं म्हणजे फार अवघड आहे. तुला या पत्राच्या साच्यात माववू तरी कसं ? तुला काय म्हणू ? प्रिय कोण ? खरंतर ‘प्रिय’ च कसं म्हणू तुला मी ? म्हणून अशीच सुरुवात करतेय.

तू,

गेले बरेच दिवस मला तुझ्याशी ‘बोलावसं’ वाटतंय. तुझ्या लाटांच्या आवाजात ‘डुंबावं’ असं वाटतंय. तुझ्यात खोल शिरून तुला ‘पहावसं’ वाटतंय. पण जितकं खोल शिरावं तितका अजूनच गहिरा होत चालला आहेस तू, आणि ते गहिरेपण मला सोसवणारं नाहीये. पण तरीही मी तुझ्या आणखीनच खोलात शिरत गेलेय.
पण आज एवढं पत्र लिहिण्यासाठी मात्र तुझ्याच किनाऱ्यावर, तुझ्यावरून येणारा खारा वारा हुंगत पडलेय. तुझ्यात बुडून गेल्यावर न येणारा तुझ्या लाटांचा आवाज कानात भरून घेतेय. हल्ली तुला असं फक्त बाहेरून बघणं जमत नाही. तरंगणाऱ्या हलक्या निळ्या रंगातून तुझं गहिरं निळेपण सरपटत वर येताना दिसतं, लाटांच्या आवाजात तुझ्या खाली दबलेली अथांग शांतता उसळून येते, आणि वाळूवरच्या गोंडस शंख-शिंपल्यांमधून भास होतो तुझ्या काळ्या पोटात चिडीचूप वावरणाऱ्या त्या अजस्त्र हिडीस— बास !
तुझ्याशी बोलायचं असेल तर असं हरवून जाऊन चालणार नाही.
अगदी सुरुवातीपासूनच सुरुवात करुया ?
आपण स्वप्नात भेटायचो ना बरेचदा ? आधी दचकून उठायचे मी. पण मग एका रात्री…
मी एका प्रचंड दगडी किल्ल्यात बंदिस्त आहे. तू वेढून टाकलंयस जिथपर्यंत नजर जातेय, आणि त्याही पलीकडे ! वरून पाऊस कोसळतोय आणि तुला अजूनच चेव चढतोय. पण तू बंदिस्त माझ्यावर अचानक हल्ला चढवत नाहीस, तुला शक्य असूनही ! हळूहळू एकेका लाटेला पुढे करत माझ्यावरती अतिक्रमण करतोस. संपूर्णपणे ! इतकं की मला स्वप्नातून जागंही नाही होता येत.
हरकत नाही ! आता मी प्रतिकार करणंच सोडलंय. पण प्रश्न मात्र पडतात…
इतक्या अनादि काळापासून मला तुझ्याबद्दल इतकं काही कसं वाटतं ? आणि तुझ्याचबद्दल का वाटतं ? तुझ्या अनोळखीपणाचं आकर्षण ? तुझ्या विक्राळपणाची भीती ? तुझ्या अखंड गाजेमुळे येणारी अस्वस्थता ? हे आकर्षण, भीती, अस्वस्थता, तर बऱ्याच गोष्टींत भरून राहिलीये… अंतराळ, जंगल, न दिसणारी अतिसूक्ष्म जीवसृष्टी, न कळणारे अतिमानवी संकेत… मग तुझ्यात असं काय वेगळंय ? तूच का ? कशासाठी ?
माझ्याही फार आधीपासून तू इथे आहेस. ज्या जमिनीवर माझे पाय टेकले तिच्याहीपेक्षा पुरातन… असाच्या असा ! बदलला नाहीस कधीच… तुला फिकीर नाही कोणाचीच… तू फक्त आहेस. पण तुझा तो अनादी अंश माझ्यातही आहे. जन्माआधीपासूनच तू भिनलायस माझ्यात… ही तुझ्याप्रतीची माझी ओढ, त्या अंशामुळे ! आणि त्यामुळे तूही आता तुझा राहिला नाहीस… हे तुला सहन झालं नाही. तुला तुझं पुरातनत्व राखायचं होतं. म्हणून माझ्यातल्या तुझ्या अंशाला तुझ्यातच विलीन करून घेऊन, पुन्हा तसंच अलिप्त, ‘शाश्‍वत’ होण्याच्या तुझ्या हट्टापायी आपुलकीचं नातं जोडलं गेलं आपल्यात… हरलास तू कधीच!
कधी माहितीये ? माझ्या स्वप्नात येऊन मला पूर्णपणे काबीज करायचं ठरवलंस, त्याच क्षणी ! तुला वाटलं किल्ला पाण्याने पूर्ण भरला की तू जिंकलास, मी तुझी झाले, तुला तुझा अंश परत मिळाला. पण तू एक विसरलास. तो किल्ला माझा होता. मी निर्माण केलेला. या तटबंदीत शिरलास आणि माझा झालास. किल्ल्यात मी नाही, तू बंदिस्त झालास.
मी आता किनार्‍यावरच राहीन.
माझ्याबरोबर तुझी शाश्वती संपली.
आता तितकं पुरातन राहणं जमणार नाही तुला.
प्रतिकार करणं सोडून दे.

तुझीच,
मी.

Saee Limaye

Saee Limaye is a Writer, Actor and Poet from Sir Parshurambhau College Pune. She has been part of ‘KavyaWachan’ in Wachanotsav episode 1.