प्रिय माणूस ,
कसे आहात ? अर्थात हे संकट कधी जाणार या विचारात असणार. विधाता परीक्षा घेतोय आपली, आणि मला विश्वास आहे की आपण ह्या परीक्षेत नक्की उत्तीर्ण होणार. माहित नाही कुठून येतो हा विश्वास पण विश्वास असणं महत्त्वाचं.
हे जग थांबलय म्हणे, प्रत्यक्ष असो वा अप्रत्यक्ष थांबलय हे सत्य, पण तुमचं. या एवढ्या मोठ्या टाळेबंदीत सुद्धा हे जग घरात शांत पहुडलय. मग काय सकाळ, दुपार आणि कसली हो संध्याकाळ ? आणि गम्मत म्हणजे बऱ्याच लोकांना रात्री लवकर झोपून सकाळी लवकर उठण्या मागचं कारण हल्ली कळत नाहीये, पण तुम्हाला. जेव्हा ही टाळेबंदी सुरू झाली तेव्हा अनेकांना आपल्या कामाबद्दल प्रश्न पडलेला, काम कसं करणार ? ऑफिस ला जाणार कसं ? पण यावर सुद्धा उपाय म्हणजे वर्क फ्रोम होम . किती भारी , काय मग घरी बसून काम करण्याचा adventure मिळतोय ना ? आणि मुख्य गोष्ट म्हणजे घरून काम केलं की स्वतः ची एक स्पेस मिळते, आणि त्या गोष्टी च सुख काही और च असतं. चला चला आता तरी बॉस च्या नावाने बोट न मोडता काम करा, पण तुम्ही. विद्यार्थी मंडळी काय म्हणताय ? साहजिकच अश्या प्रतिकूल परिस्थिती ची सवय नाही तुम्हाला, कंटाळा तर येणारच. पण ऐकलंय xyz, abc trend काहीतरी सूरुये म्हणे , नाही चांगलय अश्या परिस्थितीत मन रमवण्यासाठी काहीतरी साधन हवं असतं, पण तुम्हाला. आणि साहजिकच सगळे जण दिवसभर घरी असल्याने सारखी सारखी भूक लागणारच. मग काय रोज नवीन नवीन मेजवानी चा बेत आखला जातोय, रोज काहीतरी नवीन चविष्ट पदार्थ बनताय, पण तुमच्याकडे. आणि या संकटकाळात सध्या सगळे वेगळ्या अंगाने जीवन जगत आहात. प्रत्येकजण आपल्या कला गुणांना वाव देतोय, कोणी आपले छंद जोपासतोय, तरी कोणी खूप दिवसांनी मिळालेला ब्रेक एन्जॉय करतोय, आणि काही जण आपल्या स्पेस मध्ये जगता येत असल्याने वेगळाच आनंद व्यक्त करताना दिसताय. पण तुम्हीच हा…
अर्थात आता तुम्हा सगळ्यांना हा प्रश्न पडला असणार की मग आम्ही काय करतोय ? आम्ही या टाळेबंदी मध्ये फक्त आमच्या घराची वाट सापडतोय. आम्ही अनवाणी पायांनी पायाचे तळवे जाळत , हातावर पोट आणि मनावर दगड ठेवून वाट तूडवतोय. लेकरांची इवले इवले पाय जळत असताना या मायभूमी ला देखील त्रास होत असणार, पण कर्माची फळं कोणाला चुकली नाहीत. जग थांबलय हे खरंय पण आमची भूक नाही ना थांबली. जग टाळेबंद झालं, सगळी जनता आपापल्या घरात कैद झाली, मात्र आम्ही रस्त्यावर आलोय. घरबसल्या सोडा आमच्या नशिबी कामच उरलं नाहीये,घरबसल्या कामाचं adventure नसेलही पण भर उन्हात भुकेने व्याकुळ असताना देखील चालत राहण्याच adventure आहे नशिबी. इमोशनल स्पेस वगैरे जाऊ द्या हो , राहण्याची स्पेस सुद्धा उरली नाहीये आमच्याकडे. हे उघड आभाळ म्हणजे आमचं छत.पण त्या छतामधून सुद्धा कधी चटके देणारं उन तर कधी जोरदार पाण्याच्या धारा सतत येत असतात. खरं सांगू , आम्हाला कोणता ट्रेण्ड नकोय फक्त एक ट्रेन हविये, मन रमवन्यासाठी नाही तर घराचं अंतर कमी करण्यासाठी एक साधन हवंय. उन्हाचे चटके, उघड आभाळ, भूक , तहान आणि ढुंगणावर दंडुके हीच काय ती आमची रोजची मेजवानी . हो मात्र एका गोष्टीचं साम्य नक्की आहे, आम्ही देखील एका वेगळ्या अंगाने जीवन जगतोय. रोज आपलं लेकरू उपाशी नाही या आनंदात जगणाऱ्या आईला मुल उपाशी निपचित पडल्याचा दुःखात बघतोय. आम्ही आमच्या पाय गुणांना वाव देतोय , घरी जाण्याचा छंद पूर्ण करू बघतोय आणि वाटेत आम्ही देखील ब्रेक घेतोय. मात्र या ब्रेक च्या सोबतीने गांडीवर पडणाऱ्या वळांच्या वेदना सहन करतोय. चालून चालून हत्तीसारखे पाय झालेत, आज काल लेकरू चॉकलेट गोळ्यांसाठी नाही तर भूक मिटवण्यासाठी दोन घासांचा हट्ट करतंय. भर उन्हात चालून आलेल्या घामानेच तहान मिटवू बघतोय.
आता तरी मान्य करा, चुकलोआहोत आपण. तुम्ही आम्ही सगळे जण शिक्षा भोगतोय. तुम्ही चूक आम्ही बरोबर किंवा तुम्हाला आनंद आम्हाला वेदना अशी काही तक्रार नाही.
फक्त हा भेद कशासाठी हा एकच प्रश्न ? भुकेला कोणता धर्म, जात किंवा पंथ नाही मग हा दूजाभाव कशासाठी ? आमच्या घरांच्या वाटा का बंद आहेत ? आपल्या कर्माची फळं हे चिमुकले जीव का भोगताय ? माणूस खाल्ल्या मिठाची चव का विसरलाय ? माणसातला माणूस का हरवलाय ? गावी परतलेले हे पाय पुन्हा शहरांकडे वळतील का ? या सगळ्या प्रश्नांची उत्तरे तुमच्या कडे देखील नसली तरी हे प्रश्न सोडवण्याचा बळ नक्कीच आपल्या सगळ्यांमध्ये आहे. आपल्या आत असलेल्या माणसाकडे आहे.
तुमच्यातलाच एक ,
माणूस
Kamal ❣️
मनाला भिडणारं पत्र.✨
Wowwwsuch an amazing… Tu tuze vichar khup spasht Ani uttam mandley dear so proud of you